कल्याणमधील दुर्गाडीजवळ खडकपाडा पोलिसांची कारवाई
कल्याण : गुजरात राज्यातील वापी येथून चोरट्या मार्गाने आणलेला ३० लाख रूपये प्रतिबंंधित गुटख्याचा साठा कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ गुरुवारी दुपारी खडकपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुजरातमधील गुटखा घेऊन येणाऱ्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी विनोद गंगवाणी याचा पोलीस शोध घेत आहेत. मोहम्मद राजा मोनीस पठाण (२६) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो गुजरातमधील वापी भागात डोंगरी फरीया येथे स्पीन पार्क इमारतीत राहतो.
कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, उल्हासनगर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, भिवंडी परिसरातील पानटपऱ्यांवर अलीकडे अधिक प्रमाणात प्रतिबंधित गुटखा चोरून विकला जात असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. युवा वर्ग प्रतिबंधित गुटखा खाण्याकडे अधिक वळला असल्याच्या तक्रारी आहेत.
खडकपाडा पोलीस ठाण्यातील हवालदार नामदेव व्हटकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहम्मद, फरार आरोपी विनोद गंगवाणी याच्या विरूध्द मानवी जीवनास हानीकारक होईल अशा प्रतिबंधित गुटख्याची विक्री, अन्न आणि औषध प्रशासन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी खडकपाडा पोलीस कल्याण मधील दुर्गाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दुर्गाडी किल्ला येथून एक ट्रक चालक भरधाव वेगात संशयास्पदरित्या ट्रक चालवित असल्याचे आढळले. पोलिसांनी पाठलाग करून मोहम्मद याचा ट्रक रोखून धरला. त्याला ट्रकमध्ये काय आहे याची माहिती विचारली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ट्रकमध्ये काय आहे याची माहिती चालक देत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांंनी तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावून मोहम्मद याच्या ट्रकची तपासणी केली. ट्रकमधील प्रतिबंधित गुटख्याचा साठा पाहून पोलिस अचंबित झाले.
१० गोण्यांमध्ये विमल पान मसाला, एक पाकिटाची किंमत १९८ रूपये. विमल पान मसाल्याचा एकूण १४ लाखाचा साठा आढळला. तंंबाखू जर्दाच्या दीड लाख किमतीच्या ३० गोणी, लहान विमल दर्जा गुटखा एकूण ५०० पाकिटे असा एकूण ट्रकसह ३० लाखाचा गुटख्याचा साठा खडकपाडा पोलिसांंनी जप्त केला आहे. हा गुटखा उल्हासनगर परिसरात नेऊन तेथून त्याची घाऊक पध्दतीने विक्री करण्याचा तस्करांचा उद्देश असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. फरार आरोपी विनोद गंंगवाणी याच्या अटकेनंतर खरी माहिती उघड होईल, असे पोलिसांंनी सांगितले.
खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अनिल वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. ए. शिवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ए. एम. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.