२७ गावांची स्वतंत्र नगरपरिषदेची प्रक्रिया जूलै २०१८ पर्यंत पूर्ण करा : विधान परिषद सभापतींचे सरकारला निर्देश 

मुंबई :  कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया जूलै २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत २७ गावे समाविष्ट करण्यात आल्यानंतर या गावांची स्वतंत्र नगरपरिषद गठीत करण्यासाठी प्रारूप अधिसुचनेचा मसुदा प्रसिध्द केलाय. तसेच प्राप्त हरकती व सुचनांवर विभागीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या स्तरावर कार्यवाही सुरु असून अहवाल प्राप्त होताच शासन स्तरावरून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे लेखी उत्तर शासनाकडून देण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मात्र २०१६ च्या हिवाळी अधिवेशात या विषयावरील लक्षवेधी मांडण्यात आली होती त्यावेळीही शासनाने हेच उत्तर दिल्याची बाब शिंदे यांनी निदर्शनास आणून दिली. केडीएमसीतील १२ बीओटी प्रकल्पांचा अहवाल तब्बल पाच वर्षानंतर मागील आठवडयात शासनाकडे सादर झाल्याचे समजले आहे. त्यामुळे अशी दिरंगाई करणा-यांवर शासन काय कारवाई करणार ? असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी याबाबत जुलै, २०१८ पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सरकारला दिले. विहित प्रक्रिया पूर्ण करून याबाबत शासन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेईल असे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!