मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २६९ शाळांची यादी पालिकेकेने संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर गेल्यावर्षी २८३ अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यापैकी ०४ शाळांना राज्य शासनाद्वारे ‘स्वयंअर्थसहाय्यित’ तत्त्वावर परवानगी देण्यात आलेली आहे. तर, ०४ शाळांना ‘राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान’ (National Institue of Open Schooling / NIOS) यांची मान्यता प्राप्त झालेली आहे. या व्यतिरिक्त गेल्यावर्षीच्या यादीतील ११ शाळा बंद झालेल्या आहेत. यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुधारित यादीमध्ये १९ शाळांना वगळण्यात आले आहे. तसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या यादीमध्ये नव्याने आढळून आलेल्या ०५ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
२६९ अनधिकृत शाळांची यादी सन २०२२-२०२३ करीता तयार करण्यात आलेली असून, ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या तपशिलानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या शाळांचा समावेश अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये आहे, त्या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यात येऊ नये; असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे करण्यात येत आहे.