गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील ग्यारापत्तीच्या जंगलात २६ नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांचे कौतुक केले.

गडचिरोली जिल्हयातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात पोलिसांनी नक्षलवादी विरोधी मोहिम राबवली होती. हा परिसर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असून घनदाट जंगलाने व्यापला असल्याने संपर्क बाहेर करणे ही कठीण होत आहे. जंगल परिसरात दबा धरून बसलेल्यांनी पोलीस जवानावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही जशाच तसे प्रतिउत्तर दिले. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या कारवाईमध्ये २६ नक्षलींचा खात्मा केल्याची माहिती दिली, असं एएनआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

ग्यारापत्तीच्या जंगलात झालेल्या या चकमकीत 4 जवान जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पोलिसांच्या जखमी झालेल्या चारही जवानांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी जंगलात शोध मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईत ग्यारापत्तीच्या जंगलातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात काही साहित्य जप्त केलं आहे.

माओवाद्यांचा नेता ठार ?
गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवाद्याचे ठार झाले आहेत या कारवाईत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत खात्रीलायक माहिती देण्यात आलेली नाही.

गृहमंत्रयांकडून पोलिसांची प्रशंसा …
आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *