मुंबई, दि.१० जून :- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागली आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. यापुढील काळात आपल्या रस्त्यातील दगड धोंडे बाजूला सारून पुन्हा ठेच लागणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत जो समाज आपल्यापासून दुरावला गेला आहे त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आपल्याला कृतीतून दाखवावे लागतील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. दरम्यान विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या एवढयात जागा मिळायला हव्यात अशी मागणी भुजबळ यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज षण्मुखानंद सभागृह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २५ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अनिल भाईदास पाटील, मंत्री संजय बनसोडे, मंत्री अदिती तटकरे, मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, सर्व विधिमंडळ सदस्य,माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मुंबई शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव नलावडे, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, बाबा सिद्दीकी,मुश्ताक अंतुले,नरेंद्र राणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे सर्वच जाती घटकातील लोकांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. ज्या विचारांवर आपण काम करत आहोत ते विचार प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दाखवून द्यावे लागतील त्यातून राज्यातील सर्व घटकांच्या मनात आगामी काळात आपल्याला विश्वास निर्माण करावा लागेल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत घटना बदलली जाईल असा अपप्रचार झाल्याने दलित, मुस्लिम,आदिवासी यासह अल्पसंख्यांक, भटके विमुक्त समाज हा महायुती पासून काही अंशी दूर गेला. त्याचा फटका आपल्याला बसल्याचे चित्र आपल्याला बघावयास मिळाले. आगामी काळात हे चित्र आपल्याला बदलावे लागणार आहे. त्यासाठी दलित मुस्लिम आदिवासी भटके विमुक्त अल्पसंख्यांक अशा सर्व समाजाला आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला संधी द्यावी लागेल असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की महायुती सरकारने मुंबईसारख्या शहरांमध्ये हजारो कोटी रुपयांची कामे केली आणि अनेक कामे सुरू असून देखील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईमध्ये मोठा फटका बसला आहे, याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच कोण आपल्यापासून दुरावला गेला आहे याचं आत्मचिंतन होण्याची आवश्यकता असून नेमका आजार काय झाला आहे त्यावर औषध शोधलं तर यश आपल्याला नक्कीच असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण महायुती सरकारने दिले आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे. तरी देखील काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जात आहे. त्यांना समजून सांगण्याची आवश्यकता असून राज्यातील सर्व समाज हा एकसंघ असून उगाच ओबीसी मराठा असा वाद निर्माण होणार नाही याची दक्षता देखील घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
*****