गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे कोटगुल ग्यारापत्ती जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ४ पोलीस जखमी झाले होते त्या जखमी झालेल्या जवानांच्या तब्येतीची सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री तथा ठाणे गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर ऑरेंज सिटी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजनमधील निधीतून गडचिरोली पोलीस दलास ५१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली .
गडचिरोलीत २६ नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले होते. या नक्षलविरोधी कारवाईत रवींद्र नैताम, सर्वेश्वर आत्राम, महारू कुडमेथे आणि टिकाराम मथांगे हे गडचिरोली पोलिसांच्या सी ६० पथकातील चार जवान जखमी झाले होते. आज या जखमी जवानांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात जाऊन विचारपूस केली तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही संवाद साधला. हे चारही जण लवकरच पूर्ण बरे होतील, असा विश्वास डॉक्टरानी व्यक्त केला.
गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा तडाखा बसला असून नक्षलवाद्यांविरोधातील कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील असे यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गडचिरोली जिल्हयात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून नक्षलवादाकडे वळू पाहणाऱ्या तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी शिंदे यांनी बोलताना सांगितले.