डोंबिवली, दि,01 : कल्याण तालुक्यात मुंबई वडोदरा महामार्गाचे भूसंपादन सुरु असताना मोहम्मद शाहीद मिठाईवाला यांच्या नावाने 2 कोटी 8 लाख रुपयांचा बोगस भूसंपादन निवाडा जाहिर केल्याचा आरोप मिठाईवाला व त्यांचे वकील निलेश जाधव यांनी आज कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात पत्रकार परिषदेत केला.
तत्कालीन प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी या रक्कमेचा अपहार करुन ही रक्कम लाटल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मिठाईवाला हे लाभार्थी नसल्याने त्यांनी अस्तित्वात नसलेल्या बांधकामाच्या निवाडा रक्कम पुन्हा सरकार जमा केल्याचे जाधव यांनी सांगितले. या प्रकरणी वकिल जाधव यांनी मिठाईवाला यांच्या प्रकरण पाहता अशाच प्रकारे प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी भूसंपादनाच्या प्रक्रियेत जवळपास 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. जी रक्कम सरकारी खात्यात जमा झाली पाहिजे. या संदर्भात त्यांनी विविध विभागात पत्रव्यवहार करुन भांडे पाटील यांची चौकशी करुन त्यांना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणी जाधव यांनी उच्च न्यायालयात ऑगस्ट 2023 मध्ये याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. या पत्रकार परिषदेत जाधव यांनी एक व्हिडिओ समोर आणला या व्हिडिओमध्ये तत्कालीन प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी मिठाईवाला याला भूसंपादनाचा लाभार्थी नसताना 35 लाख रुपये घ्या आणि प्रकरण संपवा असे दाखविले आहे. या व्हिडियो मध्ये मिठाईवाला आणि प्रांत भांडे पाटील यांचा पैशांचा संवाद सुरु आहे. ज्यामध्ये मिठाईवाला देखील 35 लाख ऐवजी 50 लाख रुपयांची मागणी करीत आहे. तर अभिजीत भांडे पाटील यांनी तुझे नाव वापरले आहे. त्याचे 35 लाख रुपये ठिक आहे. 50 लाख रुपये जास्त आहेत असे सांगत असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.
सध्या अभिजीत भांडे पाटील हे शासनाच्या मंबई एस आर ए विभागात कार्यरत आहेत. याबाबत अभिजीत भांडे पाटील यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी जाधव व मिठाईवाला या दोघांनी केलेले आरोप हे चुकीचे व बिनबुडाचे असल्याचे सांगितले तसेच मी माझ्या कार्यकाळात केलेले सर्व निवाडे हे कायदेशीर असल्याचे स्पष्ट केलं.