मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीकामी मोठ्या मालमत्ता धारकांकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आर्थिक वर्ष २०२३ – २४ अंतर्गत आज बुधवार, दिनांक २७ मार्च २०२४ च्या दुपारपर्यंत २ हजार २१३ कोटी रुपयांचा मालमत्ता कर संकलित झाला आहे. मुंबईकर नागरिकांनी दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत मालमत्ता कर भरणा करुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने २०२३ – २४ या आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टाइतका मालमत्ता कर संकलनाकामी विविध प्रकारे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर निर्धारित कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.
नागरी विकासात मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आतापर्यंत २ हजार २१३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. सध्या करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी देखील प्राधान्य देण्यात येत आहे.
मालमत्ता कराची सुधारित देयके मालमत्ताधारकांना पाठविताच कर भरणा करण्यासाठी महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयात नागरिकांचा ओढा वाढला आहे. विभाग कार्यालयातील कर्मचाऱयांकडून वेगाने केले जाणारे कामकाज व पुरविल्या जाणा-या विविध सुविधा यामुळे कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आर्थिक वर्षातील उर्वरित ४ दिवसांत अधिकाधिक कर वसूल करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
काही मालमत्ता धारकांनी अद्यापपर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पद्धतीने मालमत्ता धारकांकडे पोहचविण्यात आली असून विहित मुदतीत त्यांनी मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह २४ विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रांमध्ये कर भरण्याची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच दिनांक २७ ते ३० मार्च दरम्यान महानगरपालिका मुख्यालयासह सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील नागरी सुविधा केंद्र सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. तर आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी अर्थात दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू रहाणार आहेत.
बुधवार, दिनांक २७ मार्च २०२४ रोजीची प्रशासकीय विभागनिहाय मालमत्ता कर वसुली-
१) ए विभाग – १०९ कोटी ८७ लाख ८९ हजार रूपये
२) बी विभाग – १७ कोटी ५० लाख १६ हजार रूपये
३) सी विभाग – ३२ कोटी १८ लाख १७ हजार रूपये
४) डी विभाग – ९२ कोटी ४३ लाख १४ हजार रूपये
५) ई विभाग – ४२ कोटी ७७ लाख ४७ हजार रूपये
६) एफ दक्षिण विभाग – ४४ कोटी ६२ लाख ६४ हजार रूपये
७) एफ उत्तर विभाग – ५१ कोटी ३८ लाख ६२ हजार रूपये
८) जी दक्षिण विभाग – १६० कोटी ८३ लाख ४७ हजार रूपये
९) जी उत्तर विभाग – ८२ कोटी ७३ लाख ९५ हजार रूपये
१०) एच पूर्व विभाग – १६८ कोटी ३४ लाख ३१ हजार रूपये
११) एच पश्चिम विभाग – १४२ कोटी ४५ लाख १८ हजार रूपये
१२) के पूर्व विभाग – २०८ कोटी ७६ लाख ३८ हजार रूपये
१३) के पश्चिम विभाग – १७४ कोटी १५ लाख २१ हजार रूपये
१४) पी दक्षिण विभाग – १२७ कोटी १६ लाख ७० हजार रूपये
१५) पी उत्तर विभाग – ९० कोटी २४ लाख २ हजार रूपये
१६) आर दक्षिण विभाग – ६४ कोटी ५५ लाख १२ हजार रूपये
१७) आर मध्य विभाग – ८१ कोटी ३९ लाख ६६ हजार रूपये
१८) आर उत्तर विभाग – ३१ कोटी ९ हजार रूपये
१९) एल विभाग – ९९ कोटी ३२ लाख २९ हजार रूपये
२०) एम पूर्व विभाग – ३५ कोटी ७१ लाख ९१ हजार रूपये
२१) एम पश्चिम विभाग – ५७ कोटी १७ लाख ४९ हजार रूपये
२२) एन विभाग – ५५ कोटी ८७ लाख ६३ हजार रूपये
२३) एस विभाग – १७० कोटी ७७ लाख ९१ हजार रूपये
२४) टी विभाग – ६३ कोटी ८ लाख ३ हजार रूपये
२५) शासन मालमत्ता – ९ कोटी ५१ लाख १३ हजार
एकूण – २ हजार २१३ कोटी ८८ लाख ५७ हजार रूपये