केडीएमसी अधिकारी – कर्मचाऱ्यांना यंदा १८ हजार बोनस
कल्याण : केडीएमसीच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा चांगलीच गोड झाली आहे. यंदाच्या दिवाळीत केडीएमसी प्रशासनाने यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक म्हणजे १८ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात केडीएमसी प्रशासनाला पत्र पाठवत कर्मचाऱ्यांना वाढीव बोनस देण्याची विनंती केली होती. केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केडीएमसीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षी १६ हजार ५०० रुपये बोनस देण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करण्याची मागणी करत केडीएमसी कर्मचाऱ्यांना यंदा२ ५ हजार रुपये बोनस जाहीर करण्याबाबत कर्मचारी युनियनतर्फे आयुक्त डॉ. दांगडे यांची भेट घेण्यात आली होती. तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही यासंदर्भात पत्र पाठवून केडीएमसी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा अधिक बोनस देण्याची सूचना केली होती असे आयुक्त डॉ. दांगडे यांनी सांगितले.
आपण हा बोनस घेणार नाही… आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे
दरम्यान केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला असला तरी आपण हा १८ हजार रुपयांचा बोनस घेणार नसल्याची प्रांजळ भूमिका जाहीर केली. त्यांचा हा कित्ता आता केडीएमसीतील इतरही क्लास वन – टू अधिकारी गिरवणार का हे लवकरच समजेल.