मनसे आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याने निधीची उपलब्धता.
कल्याण ग्रामीण : कल्याण शिळ रोड वरील पलावा कासा रियो (निळजे) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १८ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधीची उपलब्धता झाली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १८ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता खडतर रस्त्याच्या अडचणींमधून नागरिकांची सुटका होणार आहे.
कल्याण शिळ रोड वरील पलावा कासा रियो रस्ता हा गेल्या कित्तेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे.या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात देसाई खाडीचे पाणी प्रवेश करत असल्याने नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या संदर्भात स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारी नागरिकांनी आमदार राजू पाटील यांच्याकडे केल्या होत्या. आमदार राजू पाटील यांनी देखील या रस्त्यासाठी नियोजन करुन निधीची मागणी हि शासनाकडे केली होती. मुख्य रस्ता रहदारीसाठी महत्वाचा असल्याने या रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसाठी निधीची उपलब्धता व्हावी म्हणून पाठपुरावा देखील केला होता. सदर रस्ता ग्रामीण मार्ग असल्याने निधीसाठी अडचण निर्माण झाली होती. मात्र या रस्त्याची दर्जोन्नती करून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आता निधीची उपलब्धता करून दिली आहे. त्यामुळे आता लवकरच या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात कासा रिओ आणि परिसरातील नागरिकांना होणारा त्रास आताचे कायम स्वरूपी संपुष्ठात येणार आहे.