ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वीच रूग्णालयातील पाच रूग्ण दगावल्याची घटना ताजी असतानाच आज एकाच रात्री १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ही घटना घडल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या प्रकरणाची चौकशी समिती तयार करण्यात आली असून या प्रकरणाचा अहवाल आला कि तातडीने कारवाई केली जाईल असे मंत्री सावंत यांनी स्पष्ट केलय.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मी सातत्याने या घटनेची माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत आहे. वैद्यकीय शिक्षण या अंतर्गत ते हॉस्पिटल येतं. तरी सुद्धा इतके रुग्ण दगावणं ही धक्कादायक बाब आहे. कशामुळे ही घटना घडली याचा अहवाल एक दोन दिवसात येईल, असं तानाजी सावंत म्हणाले. १३ जणांचा मृत्यू हा आयसीयूमध्ये झाला आहे. तर इतर ४ हे जनरल वार्डमधील आहेत. डीनचे दुर्लक्ष झालं का हे पाहावं लागेल, पण अतिशय दुर्दैवी घटना आहे’. ‘या प्रकरणाचा अहवाल येताच नक्की कारवाई होईल. हे प्रकरण कशामुळे झालं आहे, याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. आता चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागवला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे दोघे ही लक्ष ठेऊन आहेत, असेही ते म्हणाले.
रूग्णालयाचे डीन डीन राकेश बारोट यांनी सांगितले की, रात्री मृत्यू झालेल्यांमधील पाच रुग्णांना ताप आणि दम लागत होता. त्यांच्या फुफ्फुसात जखमा झाल्या होत्या. एका रुग्णाच्या प्लेटलेट्स सहा हजारावर आल्या होत्या. एक रुग्ण केरेसीन प्यायला होता. एक अनोळखी रुग्ण होता, त्याला हेड एन्जुरी झाली होती. एकाला ब्रेन ट्रॉमा होता. चार रुग्णांचे मल्टिऑर्गन फेल्युअर झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 500 बेड आहेत. मात्र, आम्ही 600 रुग्ण भरती करून घेतले होते. आम्ही यथाशक्ती काम करतोय .इथे गरीब आदिवासी येतात. अत्यवस्थ अवस्थेत येतात. तरी आम्ही भरती करून घेऊन त्यांच्यावर उपचार करतो.सध्या आमच्याकडे 124 मेडिकल टीचर, जवळपास 150 निवासी डॉक्टर आहेत. हे डॉक्टर 500 बेडसाठी पुरेसे आहेत. मात्र, अतिरिक्त रुग्ण आल्यानं भार वाढला. किंबहुना, अतिरिक्त रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागाही नाही. एवढे रुग्ण कधी आले नाहीत. हे अचानक वाढले,” अशीही माहिती अधिष्ठात्यांनी दिली.
या घटनेनंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड मनसे अध्यक्ष अविनाश जाधव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी रूग्णालयात भेट घेत. रूग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
शरद पवारांकडून दखल …
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ठाण्यातील घटनेची दखल घेतली आहे. शरद पवारांनी ट्वीट करत म्हटलं की, “ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल रात्रभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. “गेल्या काही दिवसांपूर्वीच 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.”
‘मुख्यमंत्र्यांच्या दारात आरोग्य सुविधांचा अभाव’
ठाणे महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये रात्रभरात तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. ‘शासन आपल्या दारी’ म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारात मात्र आरोग्य सुविधांचा अभाव आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. “हॉस्पिटलमध्ये पुरेशा आरोग्याच्या सुविधा नाहीत, डॉक्टर्स नाहीत, स्टाफ नाही त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी साहजिकच मर्यादा येतात. त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतोय. लोकांचे नाहक जीव जात आहेत. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे.