नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ राबवण्याबाबतचा अहवाल गुरुवारी राष्ट्रपतींकडे सादर केला. पण या व्यवस्थेला देशातील १५ प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी विरोध केला आहे. केवळ दोनच राष्ट्रीय पक्षांनी समर्थन दिले आहे. समर्थन देणा-यांत ३२ छोट्या आणि प्रादेशिक पक्षांचाही समावेश आहे.
देशातील ४७ राजकीय पक्षांनी एक राष्ट्र एक निवडणूक या व्यवस्थेबाबत आपले मत व्यक्त केले आहे. यांपैकी ३२ राजकीय पक्षांनी या कल्पनेला पाठिंबा दिला आहे तर १५ पक्षांनी विरोध दर्शवला आहे. पण ज्या पक्षांनी या एक देश एक निवडणूक या कल्पनेला पाठिंबा दिला आहे, त्यात केवळ दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत. यामध्ये भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष एनपीपी यांचा समावेश आहे तर काँग्रेस, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या चार राष्ट्रीय पक्षांनी याला विरोध दर्शवला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील पॅनेलने देशभरातील सर्व लहान मोठ्या ६२ राजकीय पक्षांचे या कल्पनेबाबत मत जाणून घेतले आहे तर १८ राजकीय पक्षांशी स्वत: चर्चा केली.