राज्यातील १४ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण
शिर्डी : गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणे हाच खरा सामाजिक न्याय आहे. केंद्र शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ही गरीब कल्याण आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्रतील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली.
शिर्डी विमानतळाजवळ असलेल्या काकडी येथील मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात आज प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संगणकीय कळ दाबून महाराष्ट्रातील १४ हजार कोटी रुपयांहून अधिक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
“पाच वर्षांपूर्वी शिर्डीत आलो होतो तेव्हा साई शताब्दी वर्ष होते. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती.” असे वाक्य मराठीतून बोलून आपल्या भाषणाला प्रधानमंत्र्यांनी सुरुवात केली. प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राला पन्नास वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे आज जलपूजन करून लोकार्पण झाले. यामुळे या भागातील शेती पाण्याखाली येणार आहेत. पाण्याचा एक – एक थेंब अमूल्य आहे. तेव्हा पाण्याचा जपून वापर झाला पाहिजे, अशी अपेक्षाही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.
श्री साईबाबा मंदिर दर्शन रांगेचे आज लोकार्पण झाले. दर्शन रांग प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे देश – विदेशातील भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. बाबा महाराज सातारकर यांचे आज निधन झाले. त्यांनी कीर्तन- प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम केले, अशा शब्दात त्यांनी यावेळी बाबा महाराजांना श्रध्दांजली अर्पण केली.
महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्मान भारत कार्ड देण्यात येणार आहेत. या सर्वांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांना मोफत शिधावाटप योजनेवरही ४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांच्या मोफत आवास योजनांसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ‘हर घर जल’ पोहोचविण्यासाठी आतापर्यंत २ लाख कोटी खर्च करण्यात आले आहेत. पीएम स्व-निधी योजनेअंतर्गत देखील पथारी व्यवसायातील लाभार्थींना हजारो रुपयांची मदत मिळत आहे. आता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. यातून सुतार, सोनार, कुंभार, मूर्तीकार अशा लाखो कारागीरांना प्रथमच शासनाकडून मदत मिळणार आहे. या योजनेवरही १३ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत, असे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी छोट्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेतून २ लाख ६० हजार कोटी रुपये दिले आहेत. या योजनेत महाराष्ट्रातील छोट्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २६ हजार कोटी थेट पद्धतीने वर्ग केले आहेत. १९७० मध्ये घोषणा झालेला निळवंडे धरण प्रकल्प मागील पाच दशकांपासून रखडला होता. शासनाने या प्रकल्पाला गती दिली. राज्यातील अवर्षणप्रवण भागासाठी सुरू केलेली बळीराजा जल संजीवनी योजना प्रभावी ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत अंतर्गत गेल्या सात वर्षात साडेतेरा लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. एमएसपीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्याची व्यवस्था केली आहे. नुकतीच रब्बी पिकांसाठी एमएसपीची घोषणा केली असून त्यात चना, गव्हाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ऊसाचे मूल्य ३१५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. गेल्या ९ वर्षात ७० लाख कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी केले आहे. शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळावेत म्हणून साखर कारखान्यांना मदत शासनाने केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सहकारी चळवळीला बळकट करण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. देशभरात २ लाखांपेक्षा अधिक सहकारी समित्या बनविल्या जात आहेत. सहकारी संस्थांमार्फत कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येत आहेत. छोट्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक संघांच्या माध्यमातून संघटित केले जात आहे. जितका महाराष्ट्राचा विकास होईल तितकाच वेगाने देशाचा विकास होईल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात रेल्वेच्या विस्ताराबरोबर रस्ते विकासाचे काम सतत चालू आहे. ही दळण-वळण साधने प्रगती आणि सामाजिक विकासाचे नवे मार्ग बनतील, असेही प्रधानमंत्र्यांनी सांगितले.
२०४७ साली देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असताना जगात भारताचे नाव विकसित भारताच्या रुपात असेल हा संकल्प करू या, असेही प्रधानमंत्री मोदी म्हणाले.
राज्यात केंद्राच्या सहकार्यातून २ लाख कोटींची विकास कामे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात २ लाख कोटी रुपयांच्या कामाचे भूमीपूजन व लोकार्पण आतापर्यंत झाले आहे. देशाचा सर्वंकष विकासाचा ध्यास घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे जात आहेत. देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रधानमंत्री मोदी अविरतपणे कार्य करत आहेत. तोच आदर्श घेऊन आपले सरकार सुद्धा गोरगरिबांच्या विकासासाठी काम करत आहे. राज्यात नवीन विकास योजना आणण्याचे महत्त्वपूर्ण काम मोदी यांनी केले आहे.
राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला असून गोरगरिबांना या माध्यमातून विनामूल्य उपचार उपलब्ध करून दिला जात आहे. नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत विविध आरोग्य विषयक सुविधांचा कॅशलेस स्वरूपात लाभ दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.शिर्डी साईबाबा मंदिर दर्शन रांगेचा लाभ असंख्य भाविकांना होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने गेल्या वर्षभरात ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. असेही ते म्हणाले.
या विकास प्रकल्पाचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन व लोकार्पण
v महाराष्ट्रात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी ’ योजनेची ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करून शुभारंभ
v शिर्डी येथे भाविकांच्या सुविधेसाठी नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन (प्रकल्प खर्च रु. १०९ कोटी)
v निळवंडे धरण डाव्या कालव्याचे लोकार्पण (रु.५१७७ कोटी )
v राष्ट्रीय महामार्ग-१६६ च्या सांगली व बोरगाव चौपदरीकरण टप्प्याचे लोकार्पण (रु.११०२ कोटी)
v जळगाव ते भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण (रु.६४० कोटी)
v कुर्डूवाडी-लातूर रोड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण प्रकल्पाचे लोकार्पण (रु.२३७ कोटी)
v मनमाड गॅस टर्मिनल येथे अतिरिक्त सुविधांचा शुभारंभ (रु.२२१ कोटी)
v अहमदनगर येथे माता व बाल आरोग्य जिल्हा रूग्णालय भूमिपूजन (रु.२५.४५ कोटी)
v राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत अहमदनगर येथील आयुष रूग्णालय उद्घाटन (रु.९ कोटी)
v १.११ कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा शुभारंभ
v स्वामित्व योजनेंतर्गत लाभार्थींना सनद वाटप