ठाणे, दि १० : प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले उत्कृष्ट असे ठाणे तालुका क्रीडा संकुल उभे राहत आहे. येथील सुविधांचा लाभ घेऊन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाण्याचे नाव लौकिक करावे, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. या क्रीडा संकुलासाठी नगरविकास विभागाच्या निधीमधून यावर्षी ९ कोटी तर पुढील वर्षी ५ कोटी देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर नरेश मस्के, माजी मंत्री सचिन अहिर, महानगरपालिकेचे सभागृह नेते अशोक वैती, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, क्रीडा उपसंचालक संजय महाडिक, राज्य क्रीडा मार्गदर्शक महेंद्र बाभुळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे, तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे आदी यावेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, भव्यदिव्य असे क्रीडा संकुल व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती यानिमित्ताने पूर्ण होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटू खंडू रांगणेकरांपासून अनेक खेळाडुंनी जागतिकस्तरावर नावलौकिक मिळविला आहे. तालुका क्रीडा संकुलातील सुविधांचा लाभ घेऊन खेळाडूंनी असेच नावलौकिक मिळवावे. या क्रीडा संकुलासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. धर्मवीर आनंद दिघे यांनीही ठाणेमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. खेळाडू घडविण्यात जिल्ह्यातील प्रशिक्षकांचेही योगदान असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ठाणे शहरात जुन्या इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंटअंतर्गत पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकासातून नियोजनबद्ध नवे शहर वसविले जाणार आहे. यामध्ये रस्त्यांसारख्या सुविधांबरोबरच क्रीडांगणाची सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी क्रीडा संकुलासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!