डोंबिवली : वॉचमन नसलेल्या इमारती मधील बंद घरे हेरून भरदिवसा घरफोडी करत लाखोंचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. शंकर सुर्यवंशी (२६)असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात मिरारोड , डोंबिवली मधील विष्णुनगर रामनगर ,मानपाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचे एकूण दहा गुन्हे दाखल असून त्याच्याकडून पोलिसांनी वीस तोळे सोन्याच्या चांदीचे दागिने रोकड असा एकूण १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसरात दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले होते. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुनील तारमळे, भानुदास काटकर यांचे पथक नेमले.या पथकाने तपासाची चक्रे फिरवून चोरट्याचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान या पथकाने कल्याण पूर्वेकडील द्वारली परिसरातून शंकर सुर्यवंशी या चोरट्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी दरम्यान त्याने मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ,डोंबिवली पोलीस ठाणे, विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या साथीदाराच्या मदतीने तब्बल १० घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले.दरम्यान आपल्या साथीदाराच्या मदतीने शंकर दिवसा वॉचमन नसलेल्या इमारत शोधायचा. या इमारतीमधील बंद घरं हेरून घराचे कुलूप स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने तोडून घरफोडी करत असल्याचे वपोनी बागडे यांनी सांगितले.