105 killed, 170 injured in Iran blast

तेहरान, 03 जानेवारी : इराणमध्ये आज, बुधवारी झालेल्या दोन भीषण स्फोटात  १०५ पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले असून १७० जण गंभीर जखमी झाले आहेत. इराणचे माजी जनरल कासीम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदिनानिमत्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे माजी जनरल कासीम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदीनानिमित्त केरमन शहरातील स्मशानभूमीजवळ लोक जमले होते. यावेळी अचानक २ भीषण स्फोट झाले.

या स्फोटात किमान १०५ लोकांचा मृत्यू झाला तर १७० लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळेही अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा स्फोट नेमका कशामुळे झाला? हा सामान्य स्फोट होता की, दहशतवादी हल्ला होता, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून, या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कासीम सुलेमानी यांनी दोन दशकांहून अधिक काळ इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सची (आयआरजीसी) विदेशी ऑपरेशन्स शाखा असलेल्या कुड्स फोर्सचे नेतृत्व केले. जानेवारी 2020 मध्ये इराकमध्ये अमेरिकन हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. इराणचे सुप्रीमो अयातुल्ला खोमेनी यांच्यानंतर सुलेमानी दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!