कल्याण (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अकारण लाठीहल्ला व गोळीबार केल्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजच्या मराठा क्रांती मोर्चा कल्याणच्या वतीने निषेधार्थ आज (सोमवार) शांततामय मार्गाने कल्याण शहरात बंद पाळण्यात आला.
जालना जिल्हयातील अंतरवली गावात सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस प्रशासनाने लाठीहल्ला व गोळीबार केल्याची मराठा समाजाची भावना झाली आहे. या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी मराठा समाजाने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने सोमवारी कल्याण शहरातील पूर्व आणि पश्चिमेतील बाजारपेठ परिसरात फिरून शांततामय मार्गाने व्यापारी-दुकानदार, प्रवासी वाहन चालकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात व्यापारी-दुकानदारांनी त्याला प्रतिसाद देत बंद पाळला. तत्पूर्वी रविवारी सोशल मिडीयाच्या माध्यमातून बंद पाळण्याचे आवाहनही करण्यात आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे, आम आदमी पक्षाचे नेते राजेश शेलार, संघटक राजू पांडे, संभाजी ब्रिगेडचे ठाणे मध्य जिल्हाध्यक्ष अमित केरकर, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघचे कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष अशोक गवळी यांनीही या बंदला पाठींबा दिला.
सकल मराठा समाजाचे धनंजय जोगदंड, हर्षवर्धन पालांडे, सुभाष गायकवाड, निलेश भोर, राहुल काटकर, संदीप देसाई, शरद पाटील, किशोर जाधव, संतोष जाधव, सतीश पेडणेकर, अनिल कोकाटे, अमित देशमुख, अंकुश मुळीक, किशोर दुबे, नारायण पाटील, रविंद्र लांडे आदी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी छ. शिवाजी महाराज चौक, कल्याण (प.) येथून पायी तसेच दुचाकीवरून बाजारपेठेतील व्यापारी व दुकानदारांना बंद पाळण्याचे आवाहन केले. या निवडक कार्यकर्त्यांव्यतिरिक्त अन्य कार्यकर्ते ‘बंद’चे आवाहन करणार नाहीत, असा निर्णय सकल मराठा समाज, कल्याणच्या वतीने घेण्यात आला होता. रिक्षा चालकांकडून मात्र या बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.