मुंबई : पावसाचे आगमन उशिराने झाल्याने यंदा मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने शनिवार दिनांक १ जुलै २०२३ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे. पावसाअभावी जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

यंदा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत ३ टक्क्यांनी कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त ९९ हजार १६४ दशलक्ष लिटर म्हणजे ६.८५ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये शनिवार दिनांक १ जुलै २०२३ पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्ये देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे.

सात तलावांतून मुंबईला पाणीपुरवठा

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. पाऊस लांबल्याने तलावातील पाणीसाठा कमी झाला असून तळ गाठला आहे. त्यामुळे आता पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *