मुंबई : कोरोनाच्या लढाईत लसीकरण हा महत्वाचा उपाय ठरला आहे. त्यामुळे भारतासह जगभरात कोरोना लसीकरण मोहिम सुरू झाली. भारताने लसीकरणाचा १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडला असतानाच महाराष्ट्रात आतापर्यंत लसीचे १० कोटी डोस देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

‘महाराष्ट्राने आज 10 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले असल्याने त्या सर्वांचे अभिनंदन करतो असं ते ट्विटद्वारे म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडून एक विक्रम रचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आरोग्य कर्मचा-यांचे कौतूक करीत अभिनंदन केले होते.

लस नाही तर वेतन नाही

कोरोना लसीकरणात अकोला राज्यात पिछाडीवर असून अकोला जिल्ह्यात केवळ 54 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. कोरोना विरुध्दच्या लढ्यात आरोग्य हितासाठी प्रशासनाने हळूहळू कठोरता आणत लस घेणे, अनिवार्य केले आहे. लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे स्पष्ट निर्देश अकोला महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. येत्या 30 नोव्हेंबरच्या आत १०० टक्के उद्दीष्ठ पूर्ण करा असे निर्देश देऊन डोस पूर्ण केल्याशिवाय वेतन मिळणार नसल्याचे एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

ठाण्यात ८४ लाख लसीकरण
ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८४ लाख ३९ हजार ७२८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ५५ लाख ४६ हजार ३४१ नागरिकांना पहिल्या डोसचे तर २८ लाख ९३ हजार ३८७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *