डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई येथील पेट्रोल पंपाच्या जवळ सोमवारी संध्याकाळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका मोटार चालकाला (कॅब) तीन महिलांनी बनावट विदेशी चलन देऊन १ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली. राहुल सुरेश मिश्रा असे तक्रारदार चालकाचे नाव आहे. ते टिटवाळा येथे राहतात.
प्रवासी वाहतूक करत असताना ते काटई येथे पेट्रोल पंंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. तेथे तीन महिलांनी राहुल यांना पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बोलावून घेतले. आमच्याकडे दुबईतील चलनाच्या २०० नोटा आहेत. त्या तुम्ही घ्या. या बदल्यात तुम्ही आम्हाला दीड लाख रूपये द्या, असे बोलून चालकाकडील दीड लाख रूपये घेऊन तिन्ही भुरट्या महिलांनी विदेशी चलनाच्या नोटांच्या नावाने कागदाची गुंडाळे एका प्लास्टिक पिशवीत गुंडाळले. ती पिशवी चालकाच्या हातात दिली. आपणास विदेशी चलन मिळाले आहे म्हणून चालकाने ते सुरक्षित ठेवले. घरी गेल्यावर त्याला त्या गुंडाळ्यात चलना ऐवज पेपरचे गुंडाळे आढळून आले. तीन महिलांनी आपली फसवणूक केली म्हणून राहुल मिश्रा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिस त्या महिलांचा शोध घेत आहे.