डोंबिवली, दि. 08 : –
कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतील पाणी प्रश्नावर लवकरच दिलासा मिळणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी माहिती दिली. त्यांनी अमृत पाणी पुरवठा योजनेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले आणि कामाच्या संथ गतीवर टीका केली.
आमदार पाटील यांनी अधिकारी वर्गासोबत या योजनेच्या कामाची पाहणी केली आणि ढिसाळ नियोजनामुळे तसेच मुद्दाम काम थांबविल्यामुळे ही योजना संथ गतीने सुरु होती याकडे लक्ष वेधले. मात्र, सध्याच्या कामगिरीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत एप्रिल अखेरपर्यंत योजना कार्यान्वित होईल असा विश्वास व्यक्त केला.
ढिसाळ नियोजनामुळे अडथळे
अमृत योजनेत सुरुवातीला अनेक समस्या आल्या होत्या. डीपीआर तयार न करता फक्त टेंडर काढण्यात आले, टाक्यांचे लोकेशन निश्चित नव्हते, आणि ज्या जागा निवडल्या होत्या त्या ताब्यात नव्हत्या. त्यामुळे नियोजनाच्या अभावामुळे आणि काही मुद्दाम आणलेल्या अडचणींमुळे कामात मोठी दिरंगाई झाली होती.
निवडणूक निकालांवर भाष्य
आमदार राजू पाटील यांनी हरियाणा आणि जम्मू-कश्मीरमधील निवडणूक निकालांवरही भाष्य केले. हरियाणात भाजपचे यश अनपेक्षित होते असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्रात भाजप ही ‘जादू’ चालवू शकते का, हे पाहणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
ठाकरे गटातील प्रवेशांवर चिमटा
ठाकरे गटात सुरू असलेल्या नेत्यांच्या प्रवेशाबाबत राजू पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांच्या प्रवेशाचा उल्लेख करत, हा एक जाणूनबुजून रचलेला डाव आहे का, असा सवाल केला. मंत्री रविंद्र चव्हाण यांना आव्हान देण्यासाठी ही रणनिती आखली गेली आहे का, याचे उत्तर निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल असे त्यांनी सूचित केले.