मुंबई, दि. २६ : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याप्रसंगी राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात केले. सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागामार्फत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राहुल शेवाळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सदा सरवणकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंह, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय तसेच पोलीस अधिकारी, विविध देशांचे महावाणिज्य दूत आणि नागरिक उपस्थित होते.
चित्ररथांचा सहभाग
शालेय शिक्षण व क्रीडा , जलसंपदा , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक आरोग्य , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण गृहनिर्माण, कृषी, पाणीपुरवठा व स्वच्छता, म्हाडा गृहनिर्माण, गृहविभाग (वाहतूक), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, इतर मागास बहुजन कल्याण, महसूल व वन, कामगार, ऊर्जा, नगर विकास आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या चित्ररथांनी सहभाग घेऊन जनहिताचे संदेश दिले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून सनई/ चौघडा वादक किरण शिंदे, अरूण शिंदे आणि विवेक शिंदे यांच्या वादनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. निवेदक शिबानी जोशी आणि नरेंद्र बेडेकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.