डोंबिवली, ता. 27 :-
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी अखेर शिवसेनेकडून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार भोईर यांना शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी कल्याणातील विविध ठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.
शिवसेनेच्या उच्चस्तरीय बैठकीत विश्वनाथ भोईर यांच्या कार्याचा आढावा घेत, त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. याच अनुषंगाने त्यांना एबी फॉर्म घेण्यासाठी वर्षा निवासस्थानावरून बोलावणे आले असून, त्यानुसार आमदार भोईर तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
भविष्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बळ अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले असल्याचे शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले आहे.