कल्याण, ता:१३:(प्रतिनिधी):-
महाराष्ट्राच्या अधोगतीला कारणीभूत ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारला आम्ही उलथवून टाकले, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला. शिवाय, या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याची खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे कल्याणातील स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात आले होते. यावेळी शिंदेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राज्य अधोगतीकडे ढकलल्याचे सांगितले. मात्र, महायुतीचे सरकार सत्तेवर येताच राज्याला पुन्हा एकदा उद्योग, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा यासह विविध क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदेंनी लोकसभेतील महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हवर टीका करत काँग्रेसच्या इतिहासावरही हल्ला चढवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने दिलेल्या त्रासाची आठवण करून दिली. तसेच, कल्याण पश्चिम आणि महाराष्ट्रभर महायुतीचे विकासकामे जलद गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विश्वनाथ भोईर यांचे चित्रपटातील संवादाने कौतुक
या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी “जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारुद बनता है उसे विश्वनाथ कहते हैं” या चित्रपटातील संवादाने विश्वनाथ भोईर यांचे कौतुक केले. यावेळी, कार्यकर्त्यांनी गाफील न राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
महिला सुरक्षेवर कठोर शब्दांत इशारा
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वाईट नजरेने पाहणाऱ्यांना बदलापूरच्या घटनेतील नराधमासारखेच परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. यामुळे, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
महायुतीचे फक्त विकासावर केंद्रित धोरण
कल्याणमध्ये विविध शासकीय प्रकल्पांतर्गत २०४० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी, कुशावली धरण, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांसारख्या विकास प्रकल्पांचे आश्वासन दिले. यामध्ये कल्याणकरांची भरघोस साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख उपस्थित मान्यवर
या सभेत भाजप नेते जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जगन्नाथ शिंदे, माजी आमदार नरेंद्र पवार यांसह महायुतीतील विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——