डोंबिवली, २४ ऑक्टोबर: –
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांनी गुरुवारी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.
भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या व्यस्ततेमुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार कुमार आयलानी, रिपब्लिकन पक्षाचे अण्णा रोकडे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना उर्फ नरेंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका माधुरी काळे यांनी उपस्थित राहून या शक्तिप्रदर्शनास साथ दिली.
शक्तिप्रदर्शनाची भव्य मिरवणूक
तिसगाव नाका येथील आमदार गणपत गायकवाड यांच्या ‘तिसाई हाऊस’ या निवासस्थानातून उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. फटाक्यांच्या अतिशबाजीने सुरू झालेल्या या मिरवणुकीत ढोल-ताशा वाद्यांच्या गजरात चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीच्या आणि सुलभा गायकवाड यांच्या विजयाच्या घोषणा परिसरात घुमत होत्या.सजविलेल्या रथामधून सुलभा गायकवाड, मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील आणि गायकवाड कुटुंबीयांनी उपस्थित जनतेला अभिवादन केले. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.
—–