ठाणे :१३:-(अविनाश उबाळे )
इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातील पाणी गुरुत्वाकर्षण द्वारे शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर पुरविण्यासाठी सुरू असलेल्या भावली पाणी पुरवठा योजना ही सपशेल बोगस ठरणार असून ३५० कोटी खर्च अपेक्षित असलेल्या या अपुर्ण योजनेच्या कामाचे जवळपास १४० कोटी रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.एका माजी आमदाराचा हट्ट पुरवण्यासाठी या योजनेचा घाट घातला जात आहे.या भावली पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.केवळ योजनेसाठी थातूरमातूर पाईप लाईन टाकून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत काम प्रगतीपथावर असल्याचे दाखवून रनिंग बील म्हणून १४० कोटी ठेकेदाराला अदा करण्याचा प्रताप पाणीपुरवठा मंत्रालय व संबंधित अभियंत्यांनी केला आहे.भावली पाणी पुरवठा योजनेसाठी या बांधलेल्या टाक्यांमध्ये भावलीचे पाणी केव्हा पोहचाणार आणि ते शहापूर कर जनतेला केव्हा पिण्यासाठी मिळणार ? असा संतप्त सवाल महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांनी विचारला आहे.
या भावली पाणी योजनेसाठी बांधलेल्या टाक्या शोभेच्या बाहुल्या ठरल्या आहेत.टाक्या कोलॅप्स होतील तशी भावली पाणीपुरवठा योजना देखिल कोलॅप्स होईल अशी भिती दौलत दरोडा यांनी व्यक्त केली आहे.शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दूर होईल अशी स्वप्नं लोकांना दाखवून केवळ ठेकेदार व अभियंता यांच्या संगनमताने यात भ्रष्टाचार करण्यासाठी भावली पाणीपुरवठा योजनेच्या घाट घातला जात आहे. असा घणाघाती आरोप शहापूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार दाैलत दरोडा यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला.ही योजना पुढील काळात अयशस्वी होणार असल्याचे सुतोवाच ही त्यांनी केला आहे.प्रचारा निमित्त दौऱ्यावर असताना प्रसार माध्यमांशी दौलत दरोडा यांनी संवाद यावेळी दरोडा म्हणाले की भावली धरणातील पाणी उन्हाळ्यातील मार्च,एप्रिल,मे,या कालावधीत धरणाची पाणीपातळी खालावते धरण पुर्णपणे आटून जाते आणि त्याचवेळेस शहापूर तालुक्यात भिषण अशी पाणी टंचाई असते मग जर भावली धरणातच पुरेसा पाणी साठा उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीत भावली धरण कसं काय ? शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना पाणी पुरवठा करु शकेल याबाबत दौलत दरोडा यांनी चिंता व्यक्त केली आहे.पुढील काळात भावली पाणी योजना पुर्णत्वास येईल याबाबत साशंकता वाटते आहे.योजनेसाठी बांधलेल्या टाक्यांचे बांधकाम कोसळण्याची भिती आहे.असे दरोडा म्हणाले.दरम्यान या मृगजळ ठरणा-या भावली धरण योजनेच्या भ्रष्टाचाराचे पाणी कोणा कोणाच्या खिशात मुरले आहे,असा संतप्त सवाल शहापूर तालुक्यातील तहानलेली जनता विचारत आहे.