डोंबिवली, ता. 29 (प्रतिनिधी) :-
डोंबिवली (पूर्व) ग प्रभाग क्षेत्रातील बिगर निवासी मालमत्तांवर थकबाकीपोटी कठोर कारवाई करत, एकूण 5 दुकानगाळे आणि क्रिटीकल केअर सेंटर सिल करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार व कर निर्धारण व संकलन विभागाच्या स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ग प्रभागाचे सहायक आयुक्त संजयकुमार कुमावत, अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, रामचंद्र दळवी, गोविंद पोटे, शिपाई मोहम्मद खान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिवसभरात ही धडक कारवाई केली. संबंधित मालमत्तांना वारंवार नोटीस देऊनही मालमत्ता कर भरणा न केल्यामुळे ही कारवाई आवश्यक ठरल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यामध्ये डोंबिवली (पूर्व) नांदिवली रोडवरील गोविंद राजाराम पाटील यांच्या मालकीच्या 5 दुकानगाळ्यांना रु. 11,37,234 इतक्या थकबाकीपोटी सिल करण्यात आले. तसेच, मानपाडा रोडवरील लक्ष्मी निवास येथील क्रिटीकल केअर सेंटरला रु. 7,16,743 इतक्या थकबाकीपोटी सिल करण्यात आले आहे.

महापालिकेने यापूर्वी अनेक वेळा नोटीस व सूचना देऊन थकबाकी भरण्याची विनंती केली होती. मात्र, संबंधितांनी कर न भरल्यामुळे कारवाई टाळता आली नाही. कर भरणा वेळेवर केला नाही तर अशा कठोर कारवाया सुरूच राहतील, असा इशारा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.महापालिकेच्या या कारवाईमुळे कर थकवणाऱ्या इतर मालमत्ता धारकांमध्ये खळबळ उडाली असून, वेळेत कर भरण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!