डोंबिवली, दि. 21
कल्याण-डोंबिवलीतील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवला असून, आता सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा पवित्र हक्क बजावून राष्ट्रीय सरासरी गाठण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतरही मतदारांनी हाच जोश कायम ठेवत मतदानात भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोमवारी डोंबिवलीतील वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील 144 – कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. त्यांनी EVM सुरक्षा कक्षाची आणि मतमोजणी ठिकाणाची पाहणी केली, यावेळी निवडणूक यंत्रणेच्या तयारीबाबत दोन्ही अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि निवडणूक व्यवस्थेला शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर, जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे आणि पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जनजागृती करण्यासाठी 144 – कल्याण ग्रामीण मतदार संघाच्या कार्यालयात एका शुभ्र फलकावर (कॅन्व्हासवर) आपल्या स्वाक्षरीची मोहर उमटवून जनतेला मतदानासाठी आवाहन केले. या कार्यक्रमात अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ – 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रध्दा चव्हाण, राजू राठोड, संजय भोये आणि इतर निवडणूक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतदानाच्या सरासरीला गाठण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदानात सहभाग घेण्याचे आणि आपला पवित्र हक्क बजावण्याचे आवाहन शिनगारे यांनी केले आहे.