डोंबिवली, दि. 9 (प्रतिनिधी):
कल्याणातील प्रतिष्ठित बिर्ला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक किशोर देसाई यांनी मुंबई विद्यापीठाकडून बायोटेक्नॉलॉजी विषयातील पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. प्रा. देसाई यांनी क्षयरोग (TB) आजाराच्या औषध प्रतिरोधक (MDR & XDR TB) जिवाणूंच्या जनुकांवर संशोधन केले आहे. हे संशोधन जागतिक व भारतीय संशोधन मासिकांमध्ये प्रकाशित झाले असून, अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत.
क्षयरोग हा जगभरातील जिवाणू संसर्गजन्य मृत्यूचे मुख्य कारण असून भारतातही या रोगाचा मोठा प्रादुर्भाव आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतातील राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या उद्दिष्टांची पूर्तता करून देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे, हा प्रा. देसाई यांचा मुख्य उद्देश आहे. संशोधन विषयाच्या निवडीबाबत ते म्हणाले, “देशाला क्षयरोगमुक्त बनवण्याच्या ध्यासाने प्रेरित होऊन मी या विषयाची निवड केली.”
या संशोधनासाठी प्रा. किशोर देसाई यांना बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बिर्ला महाविद्यालयाचे संचालक (शिक्षण) डॉ. नरेश चंद्र यांनी प्रा. देसाई यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
क्षयरोगाच्या औषध प्रतिरोधक जिवाणूंवरील प्रा. देसाई यांचे संशोधन जागतिक आरोग्य क्षेत्राला महत्त्वपूर्ण दिशा देणारे ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
——