डोंबिवली, दि. 14 नोव्हेंबर
डोंबिवली पश्चिमेतील भाजप पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या खासगी कार्यालयात आज सकाळी झालेल्या हल्ल्याचा महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे. यावेळी महायुती नेत्यांनी शहरातील वातावरण निवडणुकीच्या काळात शांत ठेवण्याचे आवाहन केले.
भाजप गुजराती सेलचे पदाधिकारी आणि सोशल मीडिया संयोजक जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयात काही अज्ञात व्यक्तींनी घुसून तोडफोड केल्याचा प्रकार घडला. उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ते कार्यालयात असताना काही अज्ञात लोकांनी शिवीगाळ करत खुर्च्या फेकून कार्यालयात नासधूस करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घटनेनंतर महायुतीतील भाजप, शिवसेना, आणि आरपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत हा हल्ला भ्याड असल्याचे सांगत त्याचा तीव्र निषेध केला. पोलिसांनी त्वरित हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नेत्यांनी केली.
या संदर्भात माजी उपमहापौर राहुल दामले यांनी मतदारसंघाचे नेतृत्व करणारे रविंद्र चव्हाण व केंद्रीय नेतृत्व यांचे या घटनेकडे लक्ष असल्याचे सांगितले. त्यांनी शहरातील नागरिकांना निवडणुकीच्या काळात शांतता राखण्याचे आवाहन केले. “डोंबिवलीचे नागरिक आणि महायुतीचे कार्यकर्ते शांततेने काम करणारी माणसे आहेत, या निवडणुकीत राजकीय परिपक्वता दाखवून शहराचे वातावरण न बिघडवण्याची काळजी घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे शशिकांत कांबळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी उपमहापौर राहुल दामले, समीर चिटणीस, नंदू परब, शिवाजी आव्हाड यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
———