डोंबिवली, दि. 09 :
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सेवा रस्त्याचे नुकतेच काँक्रीटीकरण झाले आहे. मेट्रोच्या कामामुळे कल्याण शिळ हायवेवर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक मोठ्या प्रमाणात या अरुंद सेवा रस्त्याचा वापर करत आहेत. परंतु या रस्त्यावर मोठ्या वाहनांची सुसाट वाहतूक होऊ लागल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत या रस्त्यावर तीन कुत्रे, दोन मांजरी आणि एक मुंगूस यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक विचारणा करत आहेत की, “आता माणसांचे बळी जाण्याची वाट पाहत आहात का?”
गतीरोधक बसवण्याची मागणी:
परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच एमआयडीसी प्रशासनाला गतीरोधक बसवण्याची मागणी केली होती. मिलापनगर रेसीडेंट्स वेल्फेअर असोसिएशनने याबाबत पत्र दिले असून, अनेक रहिवासी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना भेटून किंवा फोन करून गतीरोधक बसवण्याची विनंती करत आहेत.
पशुवैद्यकांची चिंता आणि स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया:
परिसरातील पशुवैद्यक आणि प्राणीमित्र, डॉ. मनोहर अकोले यांनी देखील या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी एका गंभीर जखमी कुत्र्याला उपचाराद्वारे वाचवण्याचा प्रयत्न केला होता. तरीसुद्धा, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आता संतप्त आहेत.
रस्ता रोको आंदोलनाची चेतावणी:
येथील रहिवासी प्रशासनाला एक आठवड्याचा वेळ देत असून, एमआयडीसी आणि केडीएमसी यांच्या विरुद्ध निषेध म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या परिस्थितीवर वेळीच उपाययोजना न केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
———-