डोंबिवली, दि. २३ (प्रतिनिधी):
डोंबिवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपाचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी चौथ्यांदा विजय मिळवून भाजपाचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. त्यांनी 77,106 मतांची आघाडी घेत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्या मशालीची वात विझवली. तिसऱ्या-चौथ्या फेरीतच निकालाचे स्पष्ट संकेत मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
मतमोजणी दरम्यान, तिसऱ्या फेरीपासून रवींद्र चव्हाण यांची आघाडी सातत्याने वाढत गेली. सहाव्या फेरीत ही आघाडी निर्णायक ठरल्याने उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आणि कार्यकर्ते हताश झाले. डोंबिवली पश्चिमेतून अपेक्षित मतांची आघाडी न मिळाल्याने ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी मतमोजणी केंद्र सोडून निघून गेले. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत डोंबिवली शहरभर विजयाची मिरवणूक काढली.
भव्य स्वागत आणि आनंदोत्सव
आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विजयाचा जल्लोष अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मतमोजणी केंद्राबाहेर आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडण्यात आले. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवले. आमदारांचे स्वागत करण्यासाठी सात ते आठ जेसीबी सजवून त्यावर फुलांची उधळण करण्यात आली. डोंबिवली शहरात ठिकठिकाणी विजयाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत होते.
मतदारसंघातील निकाल:
रवींद्र चव्हाण (भाजपा): 1,23,815 मते
दीपेश म्हात्रे (शिवसेना – उद्धव ठाकरे गट): 46,709 मते
दीपेश म्हात्रे यांना 2014 च्या निवडणुकीत मिळालेल्या 35,000 मतांच्या तुलनेत यावेळी थोडीशी प्रगती झाली असली, तरी मोठा पराभव स्वीकारावा लागला.
रवींद्र चव्हाण यांचा विजयामागील कारणे
रवींद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क, विकास कामांची प्रतिष्ठा, तसेच महायुतीच्या संघटित रणनीतीमुळे हा विजय शक्य झाला. त्यांची लोकप्रियता आणि शहरातील भाजपची मजबूत पकड यामुळे हा विजय अपेक्षित मानला जात होता.दरम्यान भाजपच्या या विजयामुळे डोंबिवलीत पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
——-