डोंबिवली : दि:०९:(प्रतिनिधी);-
येथील सिध्दी नृत्यकला मंदिराच्या कलाकारांनी कथक नृत्यानाट्यातून भगवान शिवशंकराचे कथा, प्रसंगातून विविध अविष्कार सादर केले. कलाकारांनी सादर केलेले रंगमंचावरील विविध अविष्कार वाद्यवृंदाची साथ, विद्युत दिव्यांच्या विविध झरोके, रंंगसंगतीने प्रेक्षकांना समृध्द सांस्कृतिक अनुभव देऊन गेले. हे कथक नृत्यामधील अविष्कार सादर होत असताना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.
सावित्रीबाई फुले रंगमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिध्दी नृत्यकला मंदिराच्या डोंबिवली शाखेच्या अठराव्या वर्धापनदिनानिमित्त शिवोहम हा विशेष कार्यक्रम सिध्दी नृत्यकला मंदिराच्या संचालिका श्रध्दा भिडे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला होता. सिध्दी नृत्यकला मंदिरातील पारंगत कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कलाकारांनी विद्युत दिव्यांची रंगसंगती आणि वाद्यवृदांच्या साथीने अप्रतिम सादरीकरण केले. शिव उत्पत्ती, दक्ष यज्ञ, समुद्रमंथन, गंगावतरण, शिव तांडव, शिव विवाह यासारखे प्रभावी सादरीकरण कलाकारांनी केले. नृत्य, संगीत आणि कथा यांचा अनोखा संगम पाहून प्रेक्षक भारावून गेले.
या कार्यक्रमाला संगीताचार्य, ज्येष्ठ कथक कलाकार डाॅ. वैशाली दुधे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमात वाद्यवृंदामध्ये गायन श्रीरंग टेंबे, तबला परेश शेंबेकर, हँन्डसाॅनिक ऋषिराज साळवी, सितार प्रतीक पंडित, निवेदन मंदार खराडे यांनी केले.संचालिक सिध्दी भिडे यांनी सांंगितले, कथक नृत्य कथा सांगण्याचे एक माध्यम आहे. या नृत्यशैलीचा आधार घेऊन भगवान शिव शंकराच्या जीवनातील अनेक महत्वाचे प्रसंग विद्यार्थी, नागरिकांंपर्यंत पोहचावेत या उद्देशातून या नृत्यनाट्याची आखणी केली. नृत्य, साहित्य आणि काव्यांचा आधार घेऊन हे कथा नृत्य सादर करण्यात आले. हे नृत्यनाट्य सादर करताना आम्हा कलाकारांना एक वेगळा विलक्षण अनुभव मिळाला.
——–