डोंबिवली, ता. 30 (प्रतिनिधी)
डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक आणि पाटकर रस्ता भागात गुरुवारी फ प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने आक्रमक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले. यामध्ये लोखंडी बाकडे, स्टॉल्स, आणि अन्य अडथळ्यांचा समावेश होता. या मोहिमेमुळे संपूर्ण परिसर प्रथमच फेरीवाला मुक्त झाला असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे कठोर आदेश दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाला हटाव पथकाने ही मोहीम हाती घेतली. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे फेरीवाल्यांची मोठी धावपळ झाली.
व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यासह कठडे व निवारे केले उद्ध्वस्त
मोहीमेच्या अंतर्गत, अनेक व्यापाऱ्यांनी पदपथ अडवून बांधलेले कठडे, तसेच दुकानासमोर उभारलेली निवारे तोडून टाकण्यात आली. फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक, आणि पाटकर रस्त्याच्या परिसरातील पदपथ मोकळे करण्यात आले.
नागरिकांकडून कारवाईचे स्वागत
रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांमुळे गजबजलेले असताना या मोहिमेमुळे अनेक महिन्यांनी परिसर मोकळा झाल्याचे नागरिक सांगत आहेत. पालिकेच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करताना, “रोज अशीच कारवाई झाली तर डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर कायमस्वरूपी फेरीवाला मुक्त होऊ शकतो,” अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पालिकेच्या फ प्रभागाने अशा प्रकारची नियमित आणि प्रभावी कारवाई करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
——-