सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे मैदानावर
डोंबिवली, ता. 07 (प्रतिनिधी)
डोंबिवलीकर बाल दोस्तांच्या आवडीचा किलबिल फेस्टिवल डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल रविवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळ परिसरातील रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याचे डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले.
येत्या रविवारी १० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा धमाल मजा मस्तीची संध्याकाळ घेऊन येणार आहे. डोंबिवलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल म्हणजे बाळगोपाळांसाठी हक्काचा असतो. लहान मुलांना खेळा-शिका-स्वतः बनवा या संकल्पनेवर आधारित या धमाल कार्यक्रमाचे यंदाचे १२ वे वर्ष आहे. मौज मजा धमाल मस्तीचा अविस्मरणीय उत्सव त्यात धाडसी खेळांचे साहस रंगत आणतात.
केवळ लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बारा वर्षांपूर्वी डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवलची संकल्पना सुरू केली. मुलांना चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर यासोबत कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी, वायरची खेळणी स्वतः बनवता येणार आहेत तसेच बोलक्या बाहुल्या, मोझॅक आर्ट, जम्पिंग मून वॉक, बालनाट्य, जादूचे प्रयोग यासारखे कार्यक्रम ही पाहायला मिळणार आहेत. यंदा थाऊसंड हँड डान्स ग्रुप आणि झिरो डिग्री डान्स, हा अद्भुत नृत्य प्रकार बाळगोपाळांना आकर्षित करतील. जायंट पांडा, टेडी बेअर, हेडलेस मॅन, अल्लाउद्दीनचा जिन असे विविध बहुरूपी छोट्या दोस्तांच्या चेहेऱ्यावर हास्य खुलवतील.तर साहसी खेळांमध्ये कमांडो ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायंबिंग असे थरारक प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. यंदा दोन सेगवे व्हेइकल्सचा थरार पण मुलांना अनुभवायला मिळणार आहे. तांदुळावर नाव कोरणे, मेंदी, लाखेच्या बांगड्या बनवून मिळणार आहेत. विशेष म्हणजे सर्व खेळ आणि सुविधा डोंबिवलीकर बाळ गोपाळांसाठी मोफत आहेत.
—–