मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023’ आणि ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2022’, चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर जीवनगौरव/ विशेष योगदान पुरस्कार यासह 57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आज वरळी, एनएससीआय, डोम याठिकाणी पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना मानचिन्ह, शाल आणि पुरस्काराची रोख रक्कम प्रदान करण्यात आली. तसेच यावेळी मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना देण्यात आला.
राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सन 2020 साठी ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी, सन 2021 साठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि सन 2022 साठी ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना जाहीर झाला, तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार सन 2020 साठी ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता, सन 2021 साठी ख्यातनाम गायक सोनू निगम आणि सन 2022 साठी विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला होता. त्यानुसार या सर्वांना या समारंभात सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच याच समारंभात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, आ. मनिषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.
अशोक सराफ काय म्हणाले?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना अशोक सराफ म्हणाले की, माझ्यासोबत काम करणाऱ्या छोट्या-छोट्या लोकांपासून महाराष्ट्राच्या सूज्ञ प्रेक्षकांमुळे मला पुरस्कार मिळाला आहे. ज्या महाराष्ट्रात मी वाढलो, घडलो त्याच महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान मला दिला जात आहे. त्याचा उतराई मी होईल की नाही माहित नाही. पण त्यासाठी मला तुम्ही लायक समजले त्यासाठी सर्वांचे धन्यवाद, अशी विनम्र भावना अशोक सराफांनी यावेळी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्राचा प्रेक्षक हा सूज्ञ आणि खडूस आहे. त्याला आवडलं तर आवडलं म्हणेल, नाही आवडलं तर तो तुमच्याकडे ढुंकूनही पाहाणार नाही, असा हा प्रेक्षक आहे. त्याचा सातत्याने विचार करतच मी काम करत गेलो, असेही अशोक सराफ यावेळी म्हणाले