डोंबिवली, दि. 27 :-
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच जागावाटपावरून कल्याण जिल्हा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या निवडणुकीत कोकण आणि ठाणे जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नसल्याने कल्याण जिल्हा काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच कारणामुळे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे 125 पदाधिकारी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे देत असल्याची घोषणा केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस सत्तेविरोधात काम करत असल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले की, आम्ही पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या उभारणीसाठी प्रामाणिकपणे कार्यरत होतो. परंतु, या निवडणुकीत कोकण आणि ठाणे जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने आमच्या मेहनतीचा अपमान झाला आहे. पक्षाने कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवावेत, अशी मागणी पोटे यांनी केली.
कल्याण पूर्व आणि पश्चिम हे काँग्रेसला पूरक असलेले मतदारसंघ असूनही, या ठिकाणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना सचिन पोटे म्हणाले की, शिवसेनेच्या उमेदवारांचे काम करायचे की नाही याचा निर्णय काँग्रेस पदाधिकारी लवकरच घेणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत दोन दिवस शिल्लक असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी यावर गंभीरपणे विचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन पोटे यांनी केले.या पत्रकार परिषदेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, उपाध्यक्ष राजाभाऊ पाटकर, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी, युवक काँग्रेस अध्यक्ष जपजित सिंग, ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांसह काँग्रेस पक्षातील विविध सेल व विभागांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
—