ठाणे दि. २८ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अंमली पदार्थांचे सेवन व विक्री रोखण्यासाठी ग्रामीण पोलीसांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या रासायनिक कंपन्यांची दरमहा विशेष गटामार्फत तपासणी करावी. तसेच वारंवार एकाच पत्त्यावरून येणाऱ्या तसेच परदेशातून येणाऱ्या कुरियरवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आज येथे दिले.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज अध्यक्ष तथा जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे झाली. यावेळी समितीचे सदस्य तथा अतिरिक्त आयुक्त राहुल कुमार, राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक चारुदत्त हांडे, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त राजेश चौधरी, नार्टोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधीक्षक अमोल मोरे, टपाल विभागाच्या अधीक्षक अस्मिता सिंग, जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात अमंली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक देशमाने यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्ह्यात अमंली पदार्थाविषयी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील भिवंडी येथील गोदामांची पोलीसांच्या मदतीने तपासणी करण्याच्या तसेच बंद असलेल्या एमआयडीसीमधील कंपन्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचनाही. देशमाने यांनी यावेळी दिल्या.