
डोंबिवली, ता. 27:-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) आणखी एक उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी मनसेची ओळख असलेल्या कल्याणच्या डॅशिंग उल्हास भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हास भोईर हे कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत राहिलेले असून, आपल्या मनसे स्टाईल आंदोलनांमुळे ते शहरात लोकप्रिय आहेत. यापूर्वी विविध सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी केलेली आंदोलने लक्षवेधी ठरली आहेत.
मनसेने जाहीर केलेल्या सहाव्या यादीत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भोईर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवर मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सचिन बासरे आणि शिवसेनेकडून विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी मिळाली आहे तर मनसेकडून उल्हास भोईर यांनाही रिंगणात उतरवले आहे.त्यामुळे शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बासरे यांच्यासह शिवसेनेचे विश्वनाथ भोईर आणि मनसेच्या उल्हास भोईर यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. बासरे यांच्यासह दोन प्रमुख पक्षांचे “भोईर” यांच्यात तिरंगी लढत होणार असून ही रंगतदार निवडणूक मतदारांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरणार आहे हे मात्र नक्की .
—-
