कल्याण (ता. 29):
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज शेकडो समर्थकांच्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खडकपाडा ते मुंबई विद्यापीठ चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवा रात्री जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमध्ये कल्याण पश्चिमेतून पुन्हा एकदा भोईर यांना संधी देण्यात आली आहे, आणि त्यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल केला.
मिरवणुकीदरम्यान ढोल ताशांच्या गजरात, ब्रास बँडच्या साथीने “कोण आला रे कोण आला” आणि “विश्वनाथ भोईर आगे बढो” अशा घोषणा दिल्या गेल्या. या भव्य मिरवणुकीमध्ये अनेक माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भोईर यांचे समर्थक सहभागी झाले होते.
महायुती अभेद्य, बंडखोरी होणार नाही – विश्वनाथ भोईर
अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विश्वनाथ भोईर यांनी महायुती एकसंध असल्याचा विश्वास व्यक्त केला. “महायुतीत कोणत्याही प्रकारे बंडखोरी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढणार आहोत. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सर्व अंतर्गत वाद मिटतील,” असे त्यांनी स्पष्ट केले. महायुती अभेद्य असल्याचे सांगत त्यांनी या निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी भोईर यांच्यासमवेत विजया पोटे, शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, गणेश जाधव, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, माजी नगरसेवक वैशाली विश्वनाथ भोईर, विद्याधर भोईर, मोहन उगले, छाया वाघमारे, श्रेयस समेळ, नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, युवासेनेचे सूचेत डामरे, प्रतिक पेणकर यांच्यासह कल्याण, मोहने, टिटवाळा भागातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—–