कल्याण, दि. 11 नोव्हेंबर:
विधानसभा निवडणुकीस अवघा आठवडाभर उरलेला असताना, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात बंड पुकारणारे भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी अखेर आपले बंड शमवत भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक कार्यालयात भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत, वरुण पाटील यांची भोईर यांच्या बाजूने प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. यावेळी कपिल पाटील यांनी स्पष्ट केले की, “वरुण पाटील हे महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांना निवडून आणण्यासाठी आता प्रामाणिक प्रयत्न करतील.”

राजकीय गोंधळ आणि तडजोडीची प्रक्रिया

कल्याण पश्चिम मतदारसंघात महायुतीने विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र, त्यानंतरही भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी युतीधर्म पाळावा, असा आग्रह फडणवीस यांनी वरुण पाटील यांच्यासमोर मांडला. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे पालन करत वरुण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली, अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.

या दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांमुळे, वरुण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसला तरी महायुती उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, भाजपकडून वरुण पाटील यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई स्थगित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

प्रामुख्याने उपस्थित कार्यकर्त्यांचे समर्थन

या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शिवसेना शहराध्यक्ष रवी पाटील, वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, शिवसेना महिला संघटक छायाताई वाघमारे, माजी नगरसेवक श्रेयस समेळ यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!