कल्याण, २९ नोव्हेंबर (प्रतिनिधी):
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले असून, कल्याण पश्चिम आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील दणदणीत विजयाने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिम आणि उल्हासनगरमधील विजयात नरेंद्र पवार यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. विशेषतः महायुतीच्या उमेदवारांना या भागात मिळालेल्या यशामागे नरेंद्र पवार यांची रणनीती आणि नेतृत्व महत्त्वाचे ठरल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले.
महायुतीचा ऐतिहासिक विजय
राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. राज्यातील जनतेने महायुतीवर विश्वास ठेवत महाविकास आघाडीला चारही मुंड्या चित केले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तब्बल १३२ आमदार निवडून आणत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.
कल्याण पश्चिम आणि उल्हासनगरच्या विजयामागे नरेंद्र पवार यांचे योगदान
कल्याण पश्चिम मतदारसंघात विश्वनाथ भोईर आणि उल्हासनगर मतदारसंघात कुमार आयलानी हे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या विजयासाठी भाजपने नरेंद्र पवार यांना दोन्ही मतदारसंघांचे प्रभारीपद सोपवले होते. या जबाबदारीचे उत्कृष्टपणे पालन करत पवार यांनी भाजपच्या संघटनात्मक कामाला बळ दिले.
महापालिका निवडणुकीसाठीही आत्मविश्वास
या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून आगामी महापालिका निवडणुकीतही अशाच विजयाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. नरेंद्र पवार यांनी फडणवीस यांच्यासमोर पक्षाचे महापालिका निवडणुकीसाठीचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
निवडणुकीतील यशानंतर फडणवीस यांनी पवार यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “कल्याण पश्चिम आणि उल्हासनगरमधील विजय भाजपसाठी प्रेरणादायक असून यामुळे आगामी निवडणुकीत भाजपची ताकद आणखी मजबूत होईल,” असे फडणवीस म्हणाले.
——