कल्याण, दि. 04 (प्रतिनिधी)
कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेस नेते राजाभाऊ पातकर यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार सचिन बासरे यांची ताकद वाढली आहे. परंतु भाजपच्या अंतर्गत बंडामुळे महायुतीसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते. भाजपचे शहराध्यक्ष वरूण पाटील यांनी आपली बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मतविभाजनाची शक्यता असून त्याचा फटका महायुतीला बसू शकतो.
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज संपली, त्यावेळी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अर्ज मागे घेतला. परिणामी आता कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. या लढतीत महायुतीचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे, मनसेचे उमेदवार उल्हास भोईर आणि भाजपा बंडखोर वरूण पाटील हे प्रमुख उमेदवार आहेत.
अर्ज मागे घेण्याची आज दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ होती. त्यामुळे भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवार आणि विद्यमान शहराध्यक्ष वरुण पाटील यांची भूमिका काय राहील याकडे सर्वांचे लक्ष होते. कल्याण पश्चिम मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने पक्षश्रेष्ठींनी पवार आणि पाटील यांना अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली. यामध्ये नरेंद्र पवार यांनी आपल्या अर्जाची माघार घेतली, परंतु वरुण पाटील यांनी आपल्या बंडखोरीला कायम ठेवले आहे.कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अरविंद मोरे, मोनिका पानवे, नरेंद्र मोरे, राजकुमार पातकर, अश्विनी मोकासे आणि नरेंद्र पवार या सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे.या लढतीत महायुतीला भाजप बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण वरूण पाटील यांच्या बंडखोरीमुळे मतांचे विभाजन होऊन सचिन बासरे यांचे पारडे जड होऊ शकते.