डोंबिवली: ता:27:(विशेष प्रतिनिधी):-
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत तिरंगी लढतीला रंगत येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उल्हास भोईर, शिवसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे सचिन बासरे हे तिन्ही प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
मनसेकडून उमेदवारी जाहीर झालेल्या उल्हास भोईर यांची ओळख मनसेच्या आक्रमक कार्यपद्धतीसाठी आहे. विविध सामाजिक आणि नागरी समस्यांवर आंदोलने करत त्यांनी स्थानिक जनतेचा विश्वास संपादन केला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक राहून त्यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कार्य केले आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूने जनसमर्थन असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, शिवसेनेकडून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी मतदारसंघात विकासकामे करून मतदारांचे समर्थन मिळवले आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांवर त्यांचा चांगला प्रभाव आहे, त्यामुळे त्यांचे पुनरागमन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या सचिन बासरे हेही निवडणूक रिंगणात आहेत. त्यांची ओळखही एक आक्रमक कार्यकर्ता म्हणून आहे. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून त्यांनी देखील जनतेत जाऊन मतदारांच्या समस्या सोडवण्याचे वचन दिले आहे. त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, ते देखील तगडे स्पर्धक मानले जात आहेत.
या तिन्ही उमेदवारांच्या लढतीमुळे कल्याण पश्चिममध्ये निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे. प्रत्येक उमेदवाराने आपापल्या पक्षाच्या ध्येयधोरणांवर भर देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघात रंगतदार लढत होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.
दरम्यान भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील कल्याण पश्चिम मतदार संघातून उमेदवारीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले नशीब पुन्हा एकदा आजमावणार आहेत. परंतु अद्यापही त्यांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा अथवा उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने त्यांच्या उमेदवारी विषयी साशंकता निर्माण केली जात आहे.
——