डोंबिवली , दि,10 ऑक्टबर:-
महावितरणने वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना मदतीचा हात दिला आहे. वीज पुरवठा खंडित असलेल्या १८८५ ग्राहकांनी अभय योजना-२०२४ अंतर्गत भाग घेतल्यानंतर पुन्हा वीज जोडणी मिळवली आहे. या योजनेत भाग घेण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या थकबाकीवर शंभर टक्के व्याज आणि विलंब आकार माफी दिली जात आहे, परंतु त्यासाठी किमान ३० टक्के थकबाकी भरावी लागते. या योजनेच्या माध्यमातून कल्याण परिमंडळातील २४३७ ग्राहकांनी एकत्रितपणे ३ कोटी ४१ लाख रुपये भरले असून त्यांना ९४ लाख रुपये व्याज आणि विलंब आकार माफी मिळाली आहे.
महावितरणच्या या अभय योजनेचा उद्देश आहे की ज्या ग्राहकांचे मार्च २०२४ किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झाला आहे, त्यांनी व्याज व विलंब आकार माफ करून केवळ थकबाकी भरून वीज जोडणी मिळवावी. योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांना थकबाकी एकरकमी किंवा सहा समान हप्त्यांत भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. एकरकमी थकबाकी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सवलत देखील दिली जाते.
कल्याण परिमंडळात एकूण २ लाख ९४ हजार ९१ ग्राहक या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या ग्राहकांकडे एकूण ३०१ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी असून ३ कोटी ८१ लाख रुपये विलंब आकार आणि ४० कोटी ६१ लाख रुपये व्याज थकीत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो, जो महावितरणच्या https://wss.mahadiscom.in/wss/wss या पोर्टलवर उपलब्ध आहे. महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमध्येही ऑनलाइन अर्ज करण्याची सोय केली आहे.
मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांनी या योजनेत अधिकाधिक ग्राहकांनी भाग घ्यावा आणि योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
——