सप्टेंबर, ऑक्टोबरचे मानधन डिसेंबर उजाडला तरी ट्रॅफिक वॉर्डन यांना पगार मिळेना ! तीन महिन्यांपासून मानधनापासून वंचित
डोंबिवली, ता. 16 (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केलेल्या 75 ट्रॅफिक वॉर्डनची अवस्था हलाखीची बनली आहे. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहरात रस्ते विकासकामे सुरू असताना वाहतूक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या वॉर्डनला तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे.
तुटपुंज्या मानधनावर काम, तरीही थकबाकीचे ओझे
वॉर्डनची महिना वेतन फक्त 6,000 रुपये इतकी असून, सकाळी 9 ते रात्री 9 अशी तब्बल 12 तासांची ड्युटी त्यांना करावी लागते. सप्टेंबर, ऑक्टोबर, आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांचे मानधन थकीत असून डिसेंबर उजाडला तरी त्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सणासुदीच्या काळात मानधन मिळाले नसल्याने वॉर्डनना उसनवारी करून सण साजरा करावा लागला.
वाढत्या वाहतूक कोंडीमध्ये वॉर्डनची भूमिका महत्त्वाची
कल्याण-डोंबिवलीतील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या लक्षात घेता, 2010 पासून केडीएमसीकडून ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला फक्त 8-10 वॉर्डन होते, परंतु आज ही संख्या 75 झाली आहे.हे वॉर्डन, पांढऱ्या शर्ट आणि निळ्या पॅंटच्या पोशाखात, शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांसोबत काम करतात.
किमान वेतनाची मागणी, महापालिकेच्या अनास्थेमुळे नाराजी
आधी फक्त 2,000 रुपये वेतन मिळणाऱ्या वॉर्डनला 2016 मध्ये 5,000 रुपये आणि अलीकडे 6,000 रुपये मानधन मिळू लागले. मात्र, दिवसेंदिवस महागाई वाढत असताना, किमान 12,000-15,000 रुपये मानधन द्यावे अशी त्यांची मागणी आहे. कोरोना काळात त्यांनी अहोरात्र काम केले असून, अशा परिस्थितीतदेखील त्यांचे वेतन वेळेवर मिळत नसल्याने ते नाराज आहेत.
वेतनवाढीसाठी निवेदन, अद्याप कोणतीही दखल नाही
महापालिका आयुक्तांकडे वेतनवाढीबाबत निवेदन दिले असतानाही अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. थकीत मानधन एकाच वेळी देण्यात यावे, जेणेकरून वॉर्डनवरील सणावारीसाठी व्याजाने काढले पैसे आणि उसनवारीचे ओझे कमी होईल, अशी त्यांची मागणी आहे.
सुरक्षा आणि मानधनात सुधारणा गरजेची
ड्युटीदरम्यान वॉर्डनना वाहनचालकांकडून होणाऱ्या दमदाटीला सामोरे जावे लागते, मात्र त्यांच्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. या परिस्थितीत त्यांनी महापालिकेकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.