डोंबिवली, ता. 12 (प्रतिनिधी)
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावं आणि २७ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याण ग्रामीणचे नवनियुक्त आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज एमआयडीसी विभागाचे सीईओ व सदस्य सचिव पी. वेलारासू यांची भेट घेतली.
सदर बैठकीत १४ गावं आणि २७ गावांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर झालेल्या सखोल चर्चेनुसार सदरचा पाणी प्रश्न पुढील कालावधीत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे. या चर्चेमुळे शिष्टमंडळासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिष्टमंडळात शिवसेना विधानसभा संघटक बंडूशेठ पाटील, ज्येष्ठ समाजसेवक व शिवसैनिक दत्ता शेठ वझे, उपतालुकाप्रमुख गणेश जेपाल, उपतालुकाप्रमुख विकास देसले, विभाग प्रमुख किसन जाधव, विभागप्रमुख अनिल म्हात्रे, हितेश गांधी आदी मान्यवरांचा समावेश होता.
आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली ही तातडीची कृती नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न १४ गावं आणि २७ गावांना पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
———-