डोंबिवली , दि,12; –
कल्याण ग्रामीण मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे. भोपर गावात २३ कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यांनी २७ गावांमध्ये पथदिव्यांसाठी नगरविकास विभागाकडून निधी मंजूर करून आणला आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर ६.५० कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन झालं असून, परिसरातील गटार आणि पायवाटांच्या कामांना सुरुवात झाली आहे. लोढा हेवन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या सर्व विकास कामांच्या भूमिपूजन समारंभात स्थानिक नागरिकांनी आमदार पाटील यांचं भरभरून कौतुक केलं. कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, उपशहराध्यक्ष प्रभाकर जाधव, विभागाध्यक्ष रोहित भोईर, तसेच भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष संदीप माळी, प्रसाद माळी, अमर माळी आणि अन्य स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
—–