डोंबिवली, २४ ऑक्टोबर:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते प्रमोद उर्फ राजू पाटील यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी उमेदवार राजू पाटील यांच्या वाहनाचे स्टेअरिंग स्वतः हाताळल्याचे दृश्य विशेष आकर्षण ठरले. या प्रसंगी मनसेने मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करत जोरदार रॅलीचे आयोजन केले.
कल्याण-शिळ महामार्गावरील कै. भागाशेठ वझे चौकातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या अद्ययावत निवडणूक कार्यालयाजवळून गुरुवारी सकाळी ११ वाजता रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीत मनसेच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत समाविष्ट झालेल्या १४ गावांतील नागरिक, तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांतील ग्रामस्थ आणि मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीमध्ये महिलांचा, तरुणांचा आणि विविध प्रभागांतील रहिवाशांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. या प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार रमेश पाटील, मनसे नेते अविनाश जाधव, राजू पाटील यांच्या पत्नी योगिता पाटील, त्यांचे बंधू विनोद पाटील, माजी नगरसेवक हर्षद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी घेतले राजू पाटील यांच्या गाडीचे स्टेअरिंग हाती
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार राजू पाटील बाहेर आले, त्याच वेळी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या क्रमांक १ च्या गाडीचे स्टेअरिंग स्वतः हाती घेतले. हे दृश्य उपस्थित कार्यकर्त्यांसाठी विशेष क्षण ठरले, ज्यांनी उत्साहात या क्षणाचे फोटो आपल्या मोबाइलमध्ये टिपले.
या शक्तिप्रदर्शनाने मनसेची निवडणुकीची तयारी आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मतदारांशी असलेले मजबूत संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
—–