अखेर अखिलेश शुक्लासह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; उर्वरित आरोपींचा लवकर अटक करू – डीसीपी अतुल झेंडे
डोंबिवली : ता. 20 : (प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर गाजलेल्या कल्याणातील मराठी कुटुंब हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी अखिलेश शुक्लासह अन्य दोन आरोपींना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र विधानसभेत आणि राजकीय वर्तुळात तीव्र गदारोळ निर्माण झाला असून, कल्याण परिसरातही याचा मोठा परिणाम दिसून आला आहे.
कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स या उच्चभ्रू इमारतीत बुधवारी छोट्याशा कारणावरून वाद झाला. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या देशमुख कुटुंबावर प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली. हल्ल्याचा हा प्रकार व्हिडिओ स्वरूपात सोशल मीडियावर व्हायरल झाला.विशेषतः हल्ल्यादरम्यान मराठी असल्याच्या कारणावरून आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोपही पीडित कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे स्थानिक परिसरात आणि राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली.
स्थानिक नागरिकांची भूमिका आणि आंदोलनाची तयारी
गुरुवारी संध्याकाळी योगीधाम परिसरातील मराठी बांधवांनी एकत्र येऊन अखिलेश शुक्लावर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तत्काळ अटक न केल्यास डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिक, तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते डीसीपी अतुल झेंडे यांना भेटले. त्यांनी पोलिस प्रशासनावर शुक्लाला वाचवण्याचा गंभीर आरोप केला. यासोबतच, पोलिसांनी लावलेली कलमं आणि फिर्यादीला दिलेली वागणूक संशयास्पद असल्याचे ठणकावले.
पोलीस कारवाई आणि अटक प्रक्रिया
डीसीपी अतुल झेंडे यांनी या प्रकरणात प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आश्वासन दिले. आतापर्यंत सुमित जाधव (23) आणि रंगा उर्फ दर्शन बोराडे (22) यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी दुपारी अखिलेश शुक्ला स्वतःहून खडकपाडा पोलीस ठाण्यात हजर झाला. मात्र, पोलिसांनी त्याला स्वतः अटक केल्याचे जाहीर केले.
सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा
या घटनेचा सामाजिक स्तरावर तीव्र निषेध होत आहे. स्थानिक मराठी समाजबांधवांसोबतच अमेरिकेत स्थायिक असलेले मुंबईत राहणारे सनी पवार यांनी पीडित कुटुंबाची कल्याण येऊन भेट घेत पाठिंबा दिला आहे.तसेच जर मराठी माणसांवर आपल्या महाराष्ट्रात असे हल्ल्या होत असेल तर हे खूप वेदनादायक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याच्यावर गंभीर दखल घेऊन कारवाई केली पाहिजे असे सांगितले.
डीसीपी अतुल झेंडे यांचे आश्वासन
” या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल आणि तपासादरम्यान कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी कामात कुचराई केली असेल तर त्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरही योग्य ती कारवाई केली जाईल,” असे कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले आहे.
——-